बार्शी – इंग्रजी भाषेची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये संभाषणाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल पालके यांनी ‘चला, एकत्र इंग्रजी शिकूया’ हा उपक्रम राबविला. यामध्ये बार्शीतील शाह धारसी जीवन मॉडेल हायस्कूल, साठे वस्ती, वडाळा, पोदार स्कूल बार्शी , साधना कन्या प्रशाला, उपळाई ठोंगे येथील जिल्हा परिषद शाळा आणि पानगाव येथील संत तुकाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी नावाच्या आद्याक्षरानुसार इंग्रजीतील पाच शब्द सांगितले. कुटुंब व शाळेची माहिती, झाडे-फुले, प्राणी-पक्षी, आवडता खेळ आणि लेखक यांविषयी इंग्रजीतून माहिती मांडली. इंग्रजी वर्णमाला सरळ व उलट्या क्रमाने म्हणणे, कवितांचे पठण आणि गोष्टी सांगणे अशा कृतींतून भाषेचा सराव केला. स्वर (Vowels), व्यंजने (Consonants) आणि उपपदे (Articles) यांचाही अभ्यास करण्यात आला.
पाठांतराऐवजी प्रत्यक्ष सहभाग आणि संवादावर भर देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजीतून विचार मांडण्याची संधी मिळाली. चुका होण्याची भीती दूर करून मोकळेपणाने इंग्रजी बोलण्यास प्रोत्साहन देणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
डॉ. पालके हे इंग्रजी विषयातून १२ वेळा नेट-सेट-गेट उत्तीर्ण झाले असून, त्यांनी प्रख्यात लेखक अमिताव घोष यांच्या कादंबऱ्यांवरील संशोधनातून पीएच.डी. संपादन केली आहे. श्री शिवाजी महाविद्यालयात ते गेल्या १४ वर्षांपासून अध्यापन करीत आहेत. त्यांच्या विद्यार्थीकेंद्रित अध्यापनपद्धतीतून इंग्रजी शिकण्याला कृतीशील आणि आनंददायी स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Post Views: 10