बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज येथे नवरात्रोत्सवाच्या औचित्याने अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने “शिक्षित लोकांतील अंधश्रद्धा – स्वरूप, कारणे व उपाय” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य पदाधिकारी श्रीमती निशा भोसले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती देत या व्याख्यानाचे महत्त्व स्पष्ट केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्रीमती निशा भोसले म्हणाल्या की, “केवळ पदवी किंवा उच्च शिक्षण घेतले म्हणजे व्यक्तीचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतोच असे नाही. आजही समाजात अनेक शिक्षित व्यक्ती भीती, असुरक्षितता आणि जुन्या रूढी-परंपरांच्या प्रभावामुळे विविध अंधश्रद्धांच्या आहारी जाताना दिसतात.” शिक्षणामुळे प्रश्न विचारण्याची सवय, तार्किक विचार आणि चिकित्सेची दृष्टी निर्माण झाली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तसेच, तथाकथित चमत्कारांमागील विज्ञानाची तत्त्वे उलगडून दाखवत तरुणांनी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्ष आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास सीनियर व ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रेमा दळवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या समन्वयिका ग्रंथपाल ज्योती यादव यांनी केले.
Post Views: 22