बार्शी – असंवेदनशील समाज, सुप्त सरकार आणि तटस्थ समाज श्रमिकांचे संरक्षण आणि सामाजिक विकासातील प्रमुख अडसर आहेत, असे प्रतिपादन भारतीय आझाद कामगार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्राचार्य चंद्रहंस गंभीर यांनी हॉटेल गौरी बार्शी येथे महाराष्ट्र आझाद कामगार संघ यांचे वतीने सामाजिक क्षेत्रामधील राज्यस्तरीय कामगार नेत्यांच्या चर्चासत्रात बोलताना केले.
पुढे बोलताना गंभीर म्हणाले की, ” नवीन चार कामगार विषयक कायदे कामगारांच्या हितांचे नाहीत आणि सामाजिक सुरक्षा व लोकशाही मूल्ये,तत्वे विस्कळीत करणारे आहेत. कामगार जगताची वाटचाल पुरोगामी व्यवस्थेकडून प्रतिगमित्वाकडे वेगाने चालू आहे, खाजगीकरण, मुक्त आर्थिक धोरण, कंत्राटीकरण यांच्यामुळे संघटित आणि असंघटित कामगारांचे काम आणि नोकरी, वेतन, सुरक्षा इत्यादी धोक्यात आलेले आहेत. सरकार एकीकडे किमान वेतन कायदा करते, आणि प्रभावी अंमलबजावणी करिता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, या विरोधा भासामुळे कामगार वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. सुरक्षा, न्याय, सुधारित आणि नियमित वेतनमान आणि सामाजिक प्रतिष्ठा याकरिता भारतीय आझाद कामगार महासंघाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील लढा उभा केला जाईल.
या चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेत्या सौ. तेजस्विनी मॅडम उपस्थित होत्या.तसेच सचिव बी आर देशमुख, राज्य संपर्कप्रमुख . प्रदिप कांदे, ऍड.सौ शितल भोसले, .अमर पवार आणि ज्येष्ठ कामगार नेते नागनाथ सोनवणे यांची वर्तमान स्थिती आणि त्यामध्ये काय परिवर्तन करावे लागेल या विषयावर अभ्यासपूर्ण भाषणे झाली.प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना सौं. मस्के म्हणाल्या की, कामगार आणि नोकरवर्ग संयमाने वागतो याचा अर्थ असा नाही की, तो सतत कोणतीही तक्रार न करता अन्याय सहन करतो पण संयमाच्या मर्यादा जिथे संपतात तिथे नव्या क्रांतीची सुरुवात असते.
हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी अविनाश कावळे, .लक्ष्मण गादेकर, अंजली कदम, राजेन्द्र सिंगण, प्रा.मनोहर पाटील यांनी परिश्रम घेतले.
चर्चासत्राचे संयोजन .प्रदीप कुमार कांदे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीपराव साळवे यांनी केले.