सोलापूर : श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्ष २०२६-२७) च्या पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या आगामी वर्षासाठी मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. अरुण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
तसेच मंडळाच्या उपाध्यक्षपदी अमर रच्चा, खजिनदारपदी अशोक माचन तर सचिवपदी मधुकर गाजूल यांची निवड झाली आहे. नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अरुण व इतर पदाधिकाऱ्यांचे मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ सदस्य आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितले की, “मंडळाची परंपरा कायम राखत आगामी गणेशोत्सव अत्यंत दिमाखात, धार्मिक भाविक वातावरणात, सामाजिक उपक्रमांची जोड देऊन आणि सर्व नियमांचे पालन करून साजरा केला जाईल.” मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोपवलेली ही जबाबदारी आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास मंडळाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवीन कार्यकारिणीला भावी वाटचालीसाठी व आगामी उत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.





















