मोडनिंब (ता. माढा) परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दुष्काळाचे सावट असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी बैलांच्या सजावटीला सुरुवात केली होती.बैलांना आंघोळ घालून त्यांच्या अंगावर रंगीत झुंली, शिंगांना चंदेरी, हिरवे, पिवळे, तांबडे व गुलाबी कागद, घुंगरू, चौरी, गळ्यात घाटी व पेंडी अशा विविध साहित्यांनी सजवण्यात आले. कपाळावर टिळा, फुगे व फुलांचे हार घालून सजवलेले बैल पाहण्यासाठी ग्रामदैवत वेताळ देवस्थान परिसरात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान येथे पूजेनंतर बैलांची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. बँड, हलगी पथक, लेझीम तसेच ढोल-ताशांच्या गजरात लहानथोरांनी जल्लोष केला.यानंतर श्री महालिंगेश्वर मंदिरात दर्शन घेऊन मिरवणूक जय भवानी चौकासह गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. घरी परतल्यानंतर महिलांनी बैलांची पूजा करून औक्षण केले. सर्जा-राजाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.फटाक्यांच्या आतषबाजीत गावाच्या वेशीवर नारळ वाढवून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
दुष्काळातही सण साजरा करत परंपरेचा उत्साह
पावसाची प्रतीक्षा आणि शेतीसमोरील अडचणींचे सावट असतानाही शेतकऱ्यांनी बैलपोळ्याचा उत्साह कायम ठेवला. शेतकरी व बैल यांच्यातील ऋणानुबंध जपणारा हा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.





















