बार्शी – तालुक्यातील भोयरे येथील वैष्णवी अँग्रो प्रोडक्ट कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी सोलर प्लॅन्टमधील तब्बल १० लाख ६९ हजार ५०० रुपयांचा कॉपर केबल व इतर साहित्य चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे या परिसरातील औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अविनाश प्रदीप बागमार यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बागमार यांच्या वडिलांच्या नावावर मौजे भोयरे येथे वैष्णवी अँग्रो प्रोडक्ट हा कारखाना आहे. सदर कारखान्यात चिंचुकेपासून पावडर तयार करण्याचा व्यवसाय चालतो. कारखान्याच्या परिसरात २०२२ मध्ये सौर ऊर्जेवर आधारित ८०० केव्ही क्षमतेचा सोलर प्लॅन्ट उभारण्यात आला होता. या प्लॅन्टमध्ये सुमारे १५०० सोलर पॅनल बसविण्यात आले असून कारखान्याच्या वीज पुरवठ्यासाठी त्याचा वापर केला जात होता. सोलर प्लॅन्टच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा यंत्रणेमार्फत दोन सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते.
दि. १७ मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारखान्याचे व्यवस्थापक पोपटराव दहीहंडे हे सोलर प्लॅन्टचे रीडिंग घेण्यासाठी गेले असता रीडिंग बंद असल्याचे
त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पाहणी केली असता सोलर प्लॅन्टमधील कॉपर केबल आणि सोलर पॅनलचे कनेक्टर तोडून चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांनी अविनाश बागमार यांना घटनेची माहिती दिली.
अविनाश बागमार यांनी तत्काळ कारखान्यावर जाऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी सोलर प्लॅन्टमधील मोठ्या प्रमाणावर केबल कापून नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये सुमारे २५ हजार मीटर कॉपर केबल, सोलर पॅनल कनेक्टर, कम्युनिकेशन केबल तसेच लाईटनिंग अरेस्टर केबलचा समावेश असून एकूण चोरीचा मुद्देमाल अंदाजे १० लाख ६९ हजार ५०० रुपयांचा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दि. १६ मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते दि. १७ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Post Views: 16