बार्शी – शहर व तालुक्यातील अपघातग्रस्त जखमी रुग्णांना तात्काळ मदत मिळण्यासाठी व त्यांचे प्राण सुखरूप वाचण्यासाठी धिरज शेळके यांनी तीन वर्षांपूर्वी भगवंत सेना दलाची स्थापना केली. यामध्ये ३० सदस्य कार्यरत असून, आतापर्यंत बार्शी परिसरात झालेल्या विविध भीषण अपघातामधील जवळपास ४२ गंभीर जखमी रुग्णांना जीवनदान देण्याचे काम भगवंत सेना दलाच्या माध्यमातून केले आहे.
शुक्रवारी सकाळी ११:३० च्या दरम्यान कुडूवाडी-लातूर बायपास रोड बीआयटी कॉलेजजवळ कार व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तीन जण गंभीररित्या जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी अपघातस्थळी रस्त्यावरून ये जा करणारे प्रवासी व बघ्यांची तुफान गर्दी जमा झाली. याप्रसंगी भगवंत सेना दलाचे सदस्य दिनेश भराडिया यांनी
सदरील अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून भगवंत सेना दलाचे प्रमुख धिरज शेळके यांना फोनवरून संपर्क करून सदरील अपघाताची माहिती दिली. याप्रसंगी घरात शेळके यांनी अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिकाशी संपर्क करून थेट घटनास्थळ गाठले. अपघातामधील दुचाकी वरील तीन इसमांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने, रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालय बार्शी या ठिकाणी दाखल करण्यात आले.
तसेच दोन दिवसांपूर्वी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान कुडूवाडी-लातूर बायपास रोड, गाडेगाव चौक या ठिकाणी दूध वाहतूक करणारे अशोक लेलैंड पिकअप व रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालक अनिल मुकटे, त्याची पत्नी व दोन लहान मुले गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की धडकेमध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला व रिक्षा मधील प्रतिष्ठानच्या महिला अंदाजे चाळीस फूट अंतरावरती उडून पडून गंभीर जखमी झालेले दिसून आले. याप्रसंगी घटनास्थळी उपस्थित भगवंत सेना दलाचे प्रमुख धिरज शेळके यांनी तात्काळ दादासाहेब जानराव रुग्णवाहिकेला संपर्क केला. यावेळी रुग्णवाहिका चालक दत्ता कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना सहकारी सोनालीताई गायकवाड तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले.
भगवंत सेना दलाच्या माध्यमातून आतापर्यंत ४२ रुग्णांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आले असून, बार्शी शहर व तालुक्यामध्ये भगवंत सेना दलाच्या निस्वार्थी कार्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. यापुढे देखील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही २४ तास तत्पर असून अशी भावना भगवंत सेना दल प्रमुख धिरज शेळके यांनी व्यक्त केली आहे.