वैराग – तालुक्यातील खेडभाळणी येथील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत सध्या ‘मृत्यूचा सापळा’ बनली आहे. इमारतीची अवस्था इतकी जीर्ण आणि धोकादायक झाली आहे की, ती कधीही पत्त्यासारखी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभोवतालच्या भिंतींना मोठे भगदाड पडले असून स्लॅबचा भाग सातत्याने निखळून पडत आहे. असे असतानाही वरिष्ठ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र असून, एखादा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
जीव मुठीत धरून लोकप्रतिनिधींच्या ‘सभा’
ग्रामपंचायत ही गावाची ‘चावडी’ आणि लोकशाहीचे केंद्र असते. याच इमारतीमध्ये गावच्या विकासाचे निर्णय घेण्यासाठी सरपंच, आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक सभा व महत्त्वपूर्ण बैठका पार पडतात. मात्र, छताचे सिमेंट कधी डोक्यावर पडेल याचा नेम नसल्याने, लोकप्रतिनिधींनाही अत्यंत भीतीदायक वातावरणात हे कामकाज करावे लागत आहे. लोकप्रतिनिधींसोबतच गावातील शेकडो नागरिक विविध दाखल्यांसाठी आणि कामांसाठी येथे येतात. कर्मचाऱ्यांच्या, सदस्यांच्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे.
इमारत की मृत्यूचा सापळा? विदारक वास्तव
इमारतीच्या स्लॅबचे सिमेंट पूर्णपणे गळून पडले असून गंजलेल्या लोखंडी सळ्या उघड्यावर आल्या आहेत. कार्यालयाच्या पायऱ्या आणि मुख्य भिंतींना आरपार तडे गेले असल्याने थोडा जरी मोठा वारा किंवा पाऊस आला, तरी ही इमारत कोसळू शकते. कोणतीही नैसर्गिक आपत्ती न येताही ही वास्तू स्वतःच्या वजनाने कोसळू शकते अशी स्थिती आहे. जर कामकाज सुरू असताना ही दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
“निधी वाटपात राजकीय भेदभाव!” – सरपंच डॉ. संतोष साळुंखे
“खेडभाळणी ग्रामपंचायत इमारतीसाठी आम्ही आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही आमच्या ग्रामपंचायतीला जाणीवपूर्वक निधीपासून वंचित ठेवले जात आहे. हा केवळ निधीचा प्रश्न नसून, राजकीय हेतूने प्रेरित होऊन विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थांच्या हितासाठी तातडीने निधी मंजूर करावा.”
“प्रशासकीय पाठपुरावा सुरू, पण प्रतिसाद शून्य” – ग्रामसेवक सुभाष येलपल्ले
“इमारतीच्या दुरवस्थेबाबत आम्ही वरिष्ठ स्तरावर वारंवार पत्रव्यवहार केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. मात्र, अद्यापपर्यंत अपेक्षित प्रतिसाद किंवा आवश्यक निधी प्राप्त झालेला नाही. निधीअभावी नवीन बांधकाम थांबले आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी आम्हाला तातडीने निधीची गरज आहे. निधी मिळताच नवीन इमारत उभारण्यास आमचे प्राधान्य असेल.”
तीव्र आंदोलनाचा इशारा
खेडभाळणीतील नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून ती पाडण्याची मागणी केली आहे. जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, तर येणाऱ्या काळात प्रशासनाविरुद्ध तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

























