मुदखेड / नांदेड – तालुक्यातील जवळा मुरार येथे धक्कादायक घटना घडली असून या गावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलं तर त्यांचे आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले. त्यामुळे या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात राहणाऱ्या लखे कुटुंबातील ही घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. एकाच कुटुंबातील चार जणांच्या आयुष्याचा अशा धक्कादायक पद्धतीने अंत झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या चौघांनी आत्महत्या केली की काही घातपात झालाय, याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळतोय. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमागील कारण काय आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. बजरंग रमेश लखे (वय २२) आणि उमेश रमेश लखे (वय २५ वर्षे) या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय. तर दुसरीकडे त्यांचे वडील रमेश होनाजी लखे (वय ५१) तर आई राधाबाई रमेश लखे (वय ४४) हे दोघे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मोठा मुलगा उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. तर सामाजिक कार्यातही उमेशचा सक्रिय सहभाग होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बजरंग, उमेश, रमेश आणि राधाबाई लखे या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या चौघांचे कोणाशी वाद होते का, कौटुंबिक वादातून असं टोकाचं पाऊल उचललंय का किंवा त्यांचा घातपात झालाय का, याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डि.एस.पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन,नायब तहसीलदार मारुती जगताप, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक बुक्तरे यांनी तासभर जवळा मुरार येथे घटनेची माहिती घेतली फाॅरेंसिक लॅबही घटनास्थळी हजर होती अशी घटना तालुक्यात पहिल्यांदाच घडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

















