बार्शी – “रस्ता तेथे एस.टी.” हे एस.टी. महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. ‘सोलापूर ते कारंबा’ हा रस्ता एस.टी. स्थापन होण्यापूर्वीपासून अस्तित्वात आहे.या रस्त्याचे वेळोवेळी रुंदीकरण झालेआहे.नाल्यांवर पूल बांधण्यात आले आहेत. गेल्याच वर्षी त्या रस्त्याचे डांबरीकरण देखील झाले आहे.
पण एस.टी.सेवा सुरू झाल्यापासून आजतागायत गेली ७८ वर्षे या रस्त्यावरून एकही एस.टी.महामंडळाची बस धावली नाही.परिणामी या रस्त्यालगत असणार्या वाड्या, वस्त्या व गावांमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना एस.टी.सेवेचा लाभ मिळाला नाही.
सद्या सोलापूर ते बार्शी व बार्शी ते सोलापूर या गाड्या हैदराबाद- पुणे राष्ट्रीय महामार्गावरून बाळे मार्गे बार्शीला जातात. त्यातील काही फेऱ्या सम्राट चौकातून कारंबा मार्गे नेल्यास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होईल. तसेच मधल्या कारंबा रस्त्यावर फारशी रहदारी नसल्यामुळे गाड्या कमी वेळात जातील.या रस्त्यावरील प्रवाशांची देखील सोय होईल व एस.टी.महामंडळाचे “रस्ता तेथे एस.टी.”हे ब्रीद देखील साध्य होईल.
तरी वरील बाबी विचारात घेऊन सोलापूर ते बार्शी व बार्शी ते सोलापूर मार्गावरील काही गाड्या, विशेषतः विना थांबा गाड्या कारंबा रस्त्याने वळविण्यात याव्यात, अशी मागणी राजकुमार ताकमोगे यांनी एसटी महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.