पंढरपूर – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेचा विद्यार्थी चि.सार्थक सिद्धेश्वर लेंगरे या विद्यार्थ्यास एसएससी मार्च २०२६ परीक्षेत पुनर्मूल्यांकनानंतर पाच गुण वाढल्याने तो शंभर टक्के गुण प्राप्त करून राज्यात प्रथम आला. या विद्यार्थ्याचे इंग्रजी विषयात ०२ गुण, विज्ञान ०२ गुण व भूगोल ०२ गुण असे एकूण ०५ गुण वाढून आले.
यापूर्वी या विद्यार्थ्यास ९९.२० इतके गुण होते. मात्र त्याला शंभर टक्के गुणाचा आत्मविश्वास होता. याच प्रशालेचा विद्यार्थी चिरंजीव अथर्व अमित वाडेकर यास मार्च २०२६ परीक्षेत राज्यात शंभर टक्के गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान प्राप्त झाला होता. चि.सार्थक लेंगरे यांच्या यशामुळे द.ह. कवठेकर प्रशालेचे दोन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सर्वप्रथम झळकले. प्रशालेतील ३६ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत.
सार्थक लेंगरे याला त्याच्या शंभर टक्के यशाबद्दल पूर्ण खात्री होती. त्यानी एसएससी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची प्रत मागून तज्ञ विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुनरमुल्यांकन प्रक्रिया पार पाडली. एस.एस.सी.बोर्डाने तात्काळ पाच गुण वाढ देऊन शंभर टक्के गुण प्राप्त केल्याचे जाहीर केले. सार्थक लेंगरे याचे वडील सिद्धेश्वर लेंगरे व सौ राणी लेंगरे या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका असून सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. सार्थक याच्या गुण वाढीनंतर नंतर आपणास सार्थकच्या शंभर टक्के यशाची खात्री होती असे त्यांनी सांगितले. द.ह.कवठेकर प्रशालेचे दोन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आल्याने प्रशालेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संस्थेचे अध्यक्ष नाना मालक कवठेकर, सचिव एस.आर.पटवर्धन, मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका एस.एस.विश्वासे, पर्यवेक्षक जे.एम.शेलार यांनी सार्थक याचे अभिनंदन केले.
Post Views: 12