सोलापूर : महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी विभाग वाटपाचे सुधारित आदेश काढले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ६९ अन्वये प्रशासकीय सोयीसाठी विविध विभागांचे नियंत्रण व प्रशासनिक अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत.
नव्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे आरोग्य, मलेरिया, भूमी व मालमत्ता, अभिलेखापाल, सुरक्षा, नगर सचिव, विधान सल्लागार, विभागीय कार्यालय क्रमांक सात आदी महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप कांरजे यांच्याकडे शहर नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय (पाणीपुरवठा व जलनिस्सारण), निवडणूक व जनगणना कार्यालय, विद्युत विभाग आणि विभागीय कार्यालय क्रमांक एक याचा कारभार सोपविण्यात आला आहे.
उपायुक्त (नियंत्रण अधिकारी) सोनाली यादव यांच्याकडे सामान्य प्रशासन (भांडार सह), कर आकारणी विभाग, महिला व बालकल्याण, कामगार व जनसंपर्क, समाज विकास , विभागीय कार्यालय क्रमांक सहा आदी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन, उद्यान व पर्यावरण संवर्धन, विभागीय कार्यालय क्रमांक तीन या विभागांचा कारभार देण्यात आला आहे.
सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, निवडणूक व जनगणना, क्रीडा , अग्निशामक आणि आणीबाणी सेवा , विभागीय कार्यालय क्रमांक पाच या विभागांची जबाबदारी देण्यात आली असून सहाय्यक आयुक्त मनिषा मगर (विभाग प्रमुख) यांच्याकडे सामान्य प्रशासन, भूमी व मालमत्ता तसेच संगणक विभाग (नियंत्रण अधिकारी) , विभागीय अधिकारी कार्यालय क्रमांक दोनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यलेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांच्याकडे शिक्षण विभाग व महापालिका क्रमांक एक ते सहा शाळा, विभागीय कार्यालय क्रमांक ४ चे नियंत्रण राहणार आहे.
नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्या कडे विभागीय कार्यालय क्रमांक आठची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हार माने यांच्याकडे शिक्षण विभाग प्रमुख व महापालिका एक ते सहा शाळेचे विभाग प्रमुख जबाबदारी राहणार आहे. तसेच नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांच्याकडे परिवहन विभाग (परिवहन व्यवस्थापक या पदासह), अतिक्रमण प्रतिबंधक विभाग, मंडई कोंडवाडा व परवाना विभाग, पशुवैद्यकीय व महात्मा गांधी प्राणी संग्रहालय विभागाची धुरा सोपविण्यात आली आहे.
यापूर्वी विभाग वाटपासंदर्भात जारी करण्यात आलेले सर्व आदेश रद्द करून हा सुधारित आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. वित्तीय व प्रशासकीय अधिकारांच्या मर्यादेत राहून कामकाज करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
नियंत्रण अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्याकडील असलेले पदभार (पदभाराबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित झालेले नसल्यास) संबंधित सहाय्यक आयुक्त यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहावे.
वरील कामकाज वेळोवेळी निर्गमित केलेले वित्तीय अधिकार व प्रशासकीय अधिकार यांचे मर्यादेच्या अधीन राहून पहावयाचे आहे. वित्तीय बाबींशी निगडित सर्व प्रस्ताव / प्रकरणे मंजूर करण्यापूर्वी मुख्य लेखापरीक्षक यांच्या अभिप्रायासह सादर होतील, यांची दक्षता घेण्यात यावी. तसेच स्थायी समिती किंवा सर्व साधारण सभेकडे पाठवावयाचे कोणतेही प्रस्ताव / प्रकरणे आयुक्त यांच्या पूर्व परवानगीनेच नगर सचिव यांच्याकडे पाठवली जावीत.यापुर्वी विभाग वाटपासंदर्भात निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश अधिक्रमित करून सदरचे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.
Post Views: 11