टेंभुर्णी – भरधाव वेगात असलेल्या कारने पायी जाणाऱ्या वृद्धाला पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 6 वा. च्या सुमारास अकोले बुद्रुक शिवारात घडली. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कार चालकावर गु.र.नं. 459/2026 दाखल करण्यात आला आहे.
अकोले बुद्रुक ता. माढा येथील रहिवासी अर्जुन दिगांबर थोरात वय 60 वर्षे हे आपले सोबती दिनकर कोतमिरे यांच्यासह टेंभुर्णी ते पंढरपूर रोडने पायी घराकडे परत येत होते. माणिक मराठे यांच्या शेताजवळ ते रस्त्याच्या डाव्या बाजूने कडेला चालत असताना पाठीमागून आलेल्या मारुती सुझुकी जेन एस्टीलो कार क्र. एम.एच 12 जी.आर 0576 ने त्यांना जोरात धडक दिली. या अपघात अर्जुन थोरात हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. अपघातानंतर कार चालकानेही गाडीचे नुकसान करून घेतले.
अपघात करणाऱ्या कारचा चालक राजेंद्र बापूराव पवार रा. निरवांगी ता. इंदापूर जि. पुणे याच्याविरुद्ध मयताचे बंधू फिर्यादी दिलीप दिगांबर थोरात वय 55 वर्षे यांनी तक्रार दिली. फिर्यादीत असे म्हटले आहे की, राजेंद्र पवार याने कार हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणाने व भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा अपघात घडला.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 324 व मोटार वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा सकाळी 9.53 वा. दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पो.हे.का. 1186 जगताप हे करत आहेत.