माळशिरस : माळशिरस शहर व परिसरात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे उत्साहात आगमन झाले. घरोघरी नागरिकांनी गणपतीची उत्साहात प्रतिष्ठापना केली तर दिवसभर अनेक मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली .गणपती खरेदीसाठी व गणपतीच्या सजावटीच्या लागणाऱ्या वस्तूच्या खरेदीसाठी बाजार तळ व बस स्थानक परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.
शहरातील घरोघरी गणरायाच्या आगमनाची उत्सुकता नागरिकांना लागली होती आज सकाळपासूनच गणपती खरेदीसाठी नागरिकांची शहरात वर्दळ दिसत होती.यंदा गणेश मूर्ती पंधरा ते वीस टक्क्यांनी महाग झाल्या असल्याने शंभर रुपयांपासून पाच हजारा पर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या होत्या. माळशिरस शहरासह परिसरातील व्यापाऱ्यांनी मूर्ती विक्रीसाठी आणल्या होत्या. त्याचबरोबर गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची अनेक दुकाने शहरात आली होती. शहरातील पुणे पंढरपूर महामार्गावर गणपती व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसत होती. त्यामध्ये बाल गणेश भक्तांची गर्दी चांगलीच जाणवत होती. अनेक मंडळांनी वाजत गाजत गणरायाची मिरवणूक काढत आपल्या मंडळाच्या ठिकाणी गणपतीची स्थापना केली. माळशिरस शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच सर्व शाळांमध्ये आज गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
चौकट घेणे
शहरातील जाधव कुटुंबाने आपला घरगुती गणपती सवाद्य घोड्यावरून आणला .या मिरवणुकीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते .
चौकट
बस स्थानका समोर वाहतुकीची कोंडी होऊ नये यावर्षी प्रथमच गणेशमूर्ती विक्रीसाठी बाजार तळ येथे मांडण्यात आल्या होत्या .तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस तैनात ठेवण्यात आले होते.





















