सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांच्या कथित बेकायदेशीर प्रतिनियुक्ती प्रकरणाने आता गंभीर आणि नाट्यमय वळण घेतले आहे. मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी तब्बल ३८ दिवस उपोषण करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त होत थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. येत्या १४ एप्रिल रोजी मंत्रालय, मुंबई येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. कट्टीमनी हे २३ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोरील पूनम गेट येथे उपोषणास बसले होते. मात्र दीर्घकाळ आंदोलन करूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी उपोषण स्थगित करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला.
आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मागासवर्गीय असल्यामुळेच अन्याय होत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला सामाजिक व राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या वादाची सुरुवात सप्टेंबर २०२४ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीपासून झाली. अक्कलकोट तालुक्यातील २१ शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकार नसताना केल्याचा कट्टीमनी यांचा आरोप आहे. २०१४ मधील अधिकार २०१७ मध्ये शासनाने विभागीय आयुक्तांकडे वर्ग केल्यानंतरही जुन्या नियमांच्या आधारे नियुक्त्या करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्यामुळे या सर्व प्रतिनियुक्त्या बेकायदेशीर ठरवून तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. या प्रकरणात आवाज उठवल्यामुळेच आपल्यावर अन्यायकारक निलंबनाची कारवाई झाल्याचा आरोप करत निलंबन रद्द करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. न्याय मिळवण्यासाठी सातत्याने लढा देत असताना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















