सोलापूर : देशाला सशक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी राष्ट्रबांधणीच्या कार्यात आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात क्षितिज युवती संमेलन उत्साहात झाले. यावेळी उपस्थित शेकडो युवतींना राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि देवी सरस्वती व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा, उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, संमेलन व्यवस्था प्रमुख डॉ. स्मितांजली दामा, महानगर सहमंत्री आणि संमेलन प्रमुख नताशा कोतापल्ली, संमेलन समिती सचिव ऍड. रेवती मुदलीयार उपस्थित होते.
या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, पृथ्वीराज सावंत, अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. शांतीनाथ बागेवाडी, महानगर अध्यक्ष प्रा. शिवकुमार बिरादार, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास भंडारी, प्रा. जगदेव बिराजदार, जिल्हाप्रमुख प्रा. धन्यकुमार बिराजदार, जिल्हासंयोजक उमेश वंजारी, महानगर मंत्री रविकांत चांभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान म्हणाल्या, स्त्रियांनी न्यूनगंड झटकून पूर्वीप्रमाणे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. २०४७ साली होणाऱ्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीत स्त्रीशक्तीचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे. भारताच्या विद्यार्थ्यांना जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास फारसा शिकवला गेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ऊर्जा प्रत्येकात येणे आवश्यक असल्याचे सांगितले.




















