सोलापूर : राजकीय भूमिका बदलल्या तरी जिव्हाळ्याचे संबंध आणि कृतज्ञतेची भावना कायम राहते, याचे दर्शन पुण्यातील ‘जिजाई’ निवासस्थानी रविवारी घडले. ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा प्रभाग क्रमांक २२ चे भाजपचे नगरसेवक किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची सदिच्छा भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धाकृती मूर्तीची भेट खासदार पार्थ पवार यांना देण्यात आली.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार तसेच राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या खासदार पार्थ पवार यांचा ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देणारी अर्धाकृती मूर्ती पार्थ पवार यांना भेट देण्यात आल्याने वातावरण भावूक झाले.
यावेळी नगरसेवक किसन जाधव म्हणाले, “आज मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असलो तरी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन, त्यांनी दाखविलेली विकासाची दिशा आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही विसरू शकत नाही. ही भेट कोणत्याही राजकीय हेतूने नसून आदर, आत्मीयता आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आहे. अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने दूरदृष्टीचा विकासपुरुष गमावला. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार अजितदादांचे विकासाचे स्वप्न पुढे नेतील, असा विश्वास आहे.
यावेळी युवा नेते चेतन गायकवाड, विनायक शिवशेट्टी, माणिक कांबळे, महादेव राठोड, यल्लप्पा शिवपुरे, वैभव प्रचंडे तसेच ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Post Views: 35