अकलूज – पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी माळशिरस तालुक्यात अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही. ओढे नाले भरून वाहिले नाहीत रानातून पाणी बाहेर वाहिलं नाही जमिनीत पाणी मुरले नसल्याने विहीरी बोर कोरडे पडले आहेत सकाळी आभाळ भरून येते, दुपारी वारा सुटतो आणि रात्री चक्क चांदणे पडते, अशी विचित्र स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे.
तालुक्यात जून ते ऑगस्ट अखेरपर्यंत सरासरी १५७.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, ही टक्केवारी केवळ ६४.४ टक्के आहे. अपुऱ्या पावसावर पेरणी केलेली खरीप पिके करपून चालली आहेत. अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे पिकापेक्षा शेतात तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे निंदणी-खुरपणीचा खर्च वाढला आहे. डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर नांगरणी आणि मशागतीचे दरही वाढले आहेत.
पाऊस नसल्याने ऊस पिकाची वाढ खुंटली आहे. हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. नवीन ऊस लागवडी खोळंबल्या असून, चालू गळीत हंगामात जाणाऱ्या उसाची वाढही खुंटल्याने यंदा एकरी उत्पादन घटण्याची भीती आहे. याचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर होणार आहे.
*पाणीटंचाईची तीव्रता वाढली*
माळशिरस तालुका पूर्व आणि पश्चिम असा विभागला गेला असून पश्चिम भागात पाणीटंचाई अधिक तीव्र आहे. अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत.
गेल्या महिन्यात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नीरा आणि भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील विहिरी आणि बोअरवेलला काही प्रमाणात पाणी आले होते. कालव्याद्वारे पाणी सोडल्याने परकोलेशन आणि तलावांमध्ये पाणी आल्याने बंद पडलेले बोअरवेल सुरू झाले होते. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा बोअरवेल बंद पडू लागले असून विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. कालव्यावर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांवर निर्बंध आले आहेत. खुद्द अकलूज शहरातही तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तलावांनी पुन्हा तळ गाठला आहे.
*दुग्धव्यवसायही अडचणीत*
माळशिरस तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यातील मोठा जनावरांचा बाजार येथे भरतो. दुधाला चांगला भाव असल्याने पशुपालन हा शेतीला जोडधंदा आहे. मात्र चारा महाग झाल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. खरीपात पेरलेली मका पिके चाऱ्यासाठी विकावी लागली आहेत. काही शेतकऱ्यांनी तर उभे ऊस पीकच जनावरांच्या चाऱ्यासाठी ३ ते ५ हजार रुपये प्रति गुंठा दराने विकले आहे. तालुक्यात उसाबरोबरच केळी,डाळिंब,बोर,सिताफळ व आंबा फळ पिकांच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत ही फळ पिके सुद्धा पावसाअभावी संकटात आली आहेत