टेंभुर्णी – मौजे टेंभुर्णी येथे लोकसहभागातून व बोबडे गटाच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या कामास जुन्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने संबंधित टाकीची तात्काळ तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवप्रेमी युवकांच्या वतीने टेंभुर्णी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे.
टेंभुर्णी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टधातूचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात येणार असून परिसराचे आकर्षक सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. अंदाजे १ ते १.५ कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकासाठी लोकसहभागातून निधी उभारला जात असून बोबडे गटाच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात येत आहे. मात्र स्मारकाच्या जागेजवळील जुनी पिण्याच्या पाण्याची टाकी धोकादायक स्थितीत असल्याने स्मारकाच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर बोबडे गट प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य श्री. ऋषिकेश (बंटी नाना) मोहनराव बोबडे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी युवकांनी ग्रामपंचायतीला निवेदन सादर केले. निवेदनामध्ये जुन्या पाण्याच्या टाकीची तात्काळ तांत्रिक तपासणी करण्यात यावी, टाकी धोकादायक असल्यास नियमानुसार पाडण्यात यावी तसेच स्मारकाच्या कामासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय परवानग्या व सहकार्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य श्री. ऋषिकेश बोबडे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकाचे काम हे कोणत्याही एका गटाचे नसून संपूर्ण गावाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. पाण्याच्या टाकीची अडचण दूर करून स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे, हीच आमची भूमिका असून या पवित्र कामात कोणीही राजकारण आणू नये.”
सदर निवेदन देताना गिरीश तांबे, शकर भरगडे, संदीप साळवे, विशाल नवगीरे, पप्पू तांबे, संदीप देशमुख, सुरज देशमुख, अमित देशमुख, शुभम देशमुख, नागेश खरसाडे, दादा देवकर, अमोल देशमुख, श्रावण खरसाडे, प्रविण चव्हाण, ऋषिकेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामपंचायतीने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Post Views: 6