माढा : यावर्षी उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने मे अखेरीस शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं करपून चालले आहेत. त्यामुळे माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी व त्यांच्या पिकाचे होत असलेले नुकसान रोखण्यासाठी सीना नदीमध्ये कोळेगाव धरणातून १ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते मुन्ना साठे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वी याच सीना नदीकाठी महापूर येऊन या ठिकाणच्या शेतकऱ्यांची शेती पीक व संसार उध्वस्त झाले आहेत. महापूर येण्याचे मूळ कारण कोळेगाव धरणातून या नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. कोळेगाव धरणात झालेले अतिरिक्त पाणी सीना नदीत त्यावेळी सोडले होते. त्याचप्रमाणे आता सीना नदीकाठच्या गावाला पाण्याची गरज असताना त्या धरणातून पाणी सोडावे अशी रास्त भूमिका मुन्ना साठे यांनी घेतली आहे. तसेच उजनी धरण हे माढा तालुका असून देखील या तालुक्यातील लोकांना गरज असेल त्यावेळेस पाण्याचा फायदा होत नाही. ही सुद्धा खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे पिके वाचविण्याचे मोठे संकट उभे असुन. ते संकट दूर करण्यासाठी कोळेगाव धरणातून तातडीने १ टीएमसी पाणी सोडावे, अन्यथा १ जून रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना त्यांनी सांगितले गेल्या वर्षीच्या महापुरानतर पालकमंत्री जयकुमार गोरे यानी या भागाची पाहणी केली होती. मात्र,सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीकडेही त्यांनी लक्ष द्यावे, उजनी धरणाच्या पाणी वितरणाचे योग्य नियोजन न झाल्यानेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.तसेच भीमा-सीना जोड कालव्यातून सीना नदीसाठी २.१४ टीएमसी पाणी आरक्षित असतानाही त्याचे नियोजनशून्य वितरण झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
Post Views: 13