वाई – महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार, तसेच महासंघाचे अध्यक्ष जी. वाय. पाटील, सरचिटणीस एम. के. राऊळ आणि कार्याध्यक्ष डी.एम. बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, १९ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता वाई येथील किसान वीर महाविद्यालयात राज्य कार्यकारिणी सभा आयोजिली आहे.

सातारा जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना व शिवाजी विद्यापीठ महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सभेची जय्यत तयारी केली आहे. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संघटन अधिक मजबूत करणे आणि त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना गती देणे, हा या सभेचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये महासंघाच्या संघटनात्मक बळकटीकरणासंबंधीचे धोरणात्मक विषय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्न यांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच संघटनेच्या आगामी वाटचालीची रूपरेषा आणि नियोजित कार्यक्रमांची घोषणाही या सभेत केली जाईल.
या राज्यस्तरीय बैठकीला महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी आणि सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. आगामी काळातील आंदोलने आणि धोरणांच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महासंघाच्या राज्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी या सभेला वेळेवर व बहुसंख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करावी, असे आवाहन सातारा जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि शिवाजी विद्यापीठ महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
——





















