बार्शी – येथील महाराष्ट्र विद्यालयाने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या तब्बल ३१८ विद्यार्थ्यांनी सामूहिक दिंडी नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करुन ‘एशिया पॅसिफिक ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले. या ऐतिहासिक यशामुळे विद्यालयासह बार्शी शहराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार राजेंद्र राऊत तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव होते. यावेळी संस्थेचे सचिव पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, रमेश पाटील, डी. बी. पाटील, प्रा. सुरेश लांडगे, विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने व सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवान विठ्ठल-रुक्मिणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन करचन झाली. त्यानंतर प्राचार्या के. डी. धावणे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
यानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध, आकर्षक आणि मनमोहक असे सामूहिक दिंडी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या तालबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर प्रमुख पाहुणे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या मनोगतात दिंडी परंपरेचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या विश्वविक्रमासाठी कोल्हापूर येथील सागर बगाडे, राजेंद्र बनसोडे, करण मिरजकर आणि अक्षय कांबळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. त्यांच्या हस्ते सर्व निकषांची पडताळणी करण्यात आली. कार्यक्रमानंतर ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अधिकृत निकालात महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्व निकष यशस्वीरित्या पूर्ण केल्याने ‘एशिया पॅसिफिक ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ प्राप्त झाल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर पंचांनी वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आणि मानचिन्ह प्राचार्या के. डी. धावणे यांच्याकडे सुपूर्द केले. विद्यालयाच्यावतीने सर्व पंचांचाही सत्कार करण्यात आला.
या भव्य दिंडी नृत्यासाठी विद्यालयातील सहशिक्षक राजेश पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन के. जी. मदने यांनी केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या डॉ. मिराताई यादव, सदस्य एस. बी. शेळवणे व बी. के. भालके, सर्व कार्यकारिणी सदस्य, संस्था सदस्य, प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 9