सोलापूर – राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक महिलांचे अनुदान अचानक बंद झाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास कार्यालयासमोर महिलांची मोठी गर्दी होत आहे. शोभानगर, सात रस्ता येथील कार्यालयात दररोज शेकडो महिला चौकशीसाठी हेलपाटे मारताना दिसत असून, “पैसे का बंद झाले?” याचे उत्तर मिळवण्यासाठी भर उन्हात महिलांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र अलीकडे शासनाने लाभार्थ्यांची छाननी मोहीम राबविल्यानंतर अनेक महिलांचे पैसे थांबविण्यात आले आहेत. केवायसी अपूर्ण असणे, कुटुंबाच्या नावावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन आढळणे, तसेच इतर शासकीय निकषांमुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरल्याचे समोर आले आहे.
यामुळे संतप्त आणि संभ्रमित महिलांनी महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात गर्दी केली आहे. “आमचे पैसे का बंद झाले?”, “पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावे?”, “आम्हाला अपात्र ठरवले असेल तर त्याचा दाखला द्या,” अशा मागण्या महिला अधिकाऱ्यांसमोर मांडताना दिसत आहेत.
दरम्यान, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर यांनी सांगितले की, शासनाकडून केवायसीसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ज्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण केली, त्यांचे अनुदान सुरू आहे. मात्र शासनाच्या छानणीत वाहनधारक कुटुंबे किंवा इतर निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांचे पैसे थांबविण्यात आले आहेत.
तसेच ज्या महिलांचे लाभ बंद झाले आहेत, त्यांना संजय गांधी किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ यांसारख्या इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी “लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचा दाखला” देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेमुळे आता अनेक महिलांना कागदपत्रांसाठी धावपळही सहन करावी लागत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.
Post Views: 4