विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा धाराशिव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्थापित करण्यात आलेला आहे. हा परिसर मध्यवर्ती रहदारीचा व वर्दळीचा असल्याने या ठिकाणी कायम नागरिकांची गर्दी असते. याच चौकात शिवरायांच्या पुतळ्याभोवती अनेक दुकानदारांनी, फळ विक्रेत्यांनी, खाजगी वाहनांनी, हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीची समस्या,अस्वच्छता व गर्दी गोंगाट झाल्यामुळे या परिसराचे पावित्र्य व स्वच्छता कमी होत आहे. हा परिसर संपूर्ण शिवभक्तांसाठी पवित्र भूमी आहे. शिवछत्रपतींचा पुतळा म्हणजे एक संवेदनशील व भावनेशी निगडित असा विषय असल्यामुळे नगर परिषदेने तात्काळ कार्यवाही करून या ठिकाणावरील संपूर्ण अतिक्रमण हटवून ते पुन्हा स्थापित होणार नाही याची दक्षतापूर्वक काळजी घ्यावी. अन्यथा समितीच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल याची शासन प्रशासनाने नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव च्या वतीने मा मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद धाराशिव यांना देण्यात आले यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे जिल्हा सचिव श्री आकाश भोसले, शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे, शहर उपाध्यक्ष श्री अविनाश रणखांब, शहर सचिव श्री रामानंद माडेकर, तालुकाध्यक्ष श्री बबलू भोईटे, तालुका कार्याध्यक्ष श्री आशिष क्षिरसागर, मार्गदर्शक श्री गुंडोपंत जोशी, श्री अच्युत थोरात, रिक्षा समितीचे कार्याध्यक्ष श्री अजय भगत, कायदेशीर सल्लागार श्री ओंकार शितोळे यांचे सह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.