सोलापूर – “संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती आधुनिक तंत्रज्ञान आणि आयुर्वेद शास्त्र यांच्याशी जोडलेली एक बहुमुखी भाषा आहे. आजच्या आधुनिक युगात संस्कृत भाषेच्या अभ्यासकांसाठी अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत,” असे प्रतिपादन शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद कॉलेज साहित्य सिद्धांत व संस्कृत विभागप्रमुख डॉ. ज्योत्स्ना नवनाथ गंगासागरे यांनी केले.
येथील संगमेश्वर कॉलेज (कनिष्ठ विभाग) मधील भाषा संकुल आणि संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित ‘संस्कृत दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते. याप्रसंगी भाषा समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते उत्साहात ग्रंथपूजन करून झाली. यानंतर सुदिक्षा पटणे आणि साक्षी माशाळे या विद्यार्थिनींनी मधुर आवाजात संस्कृत गीत सादर केले.
संस्कृत अध्यापक प्रदीप आर्य यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आणि संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थी अभिराज कोळी याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी उपप्राचार्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुप्रिया आवटे हिने स्वतः रेखाटलेले एक सुंदर चित्र प्रमुख पाहुण्यांना भेट म्हणून प्रदान केले.नाटिका आणि पीपीटी सादरीकरणाने जिंकली मनेकार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व अभ्यासपूर्ण सादरीकरणे केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संस्कृत नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संस्कृत भाषा ही प्राचीन आणि आधुनिक अशा दोन्ही शिक्षण पद्धतींमध्ये कशी उपयुक्त आहे, याचे प्रभावी चित्रण या नाटिकेतून करण्यात आले. यामध्ये सुदिक्षा पटणे, जयराज आणि साक्षी माशाळे यांनी उत्कृष्ट अभिनय केला. त्यानंतर अदिती पाटील हिने पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून भारतीय वेद आणि उपनिषदांमधील तंत्रज्ञानाचे विविध पुरावे व उल्लेख अत्यंत अभ्यासूपणे मांडले.
संस्कृतकडे ज्ञानाचा साठा म्हणून पहा : उपप्राचार्य प्रसाद कुंटे
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “संस्कृतकडे केवळ एक भाषा म्हणून न पाहता, त्यातील अथांग ज्ञानाचा साठा समजून घेणे गरजेचे आहे. आपली संस्कृती आणि विज्ञान यातच दडलेले आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन साक्षी म्हेत्रे हिने केले, तर उपस्थितांचे आभार भक्ती ओलेकर हिने मानले. या कार्यक्रमाला जीवशास्त्र विभागातील प्राध्यापिका सुषमा पाटील मॅडम, खमितकर मॅडम आणि स्वामी सर यांच्यासह भाषा संकुलातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——
Post Views: 2