
सोलापूर – अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या ऐतिहासिक ‘वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना येथील प्रांजल रुपाली सोमनाथ व्हन्ना हिने दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे. जगभरातील ७१ देशांच्या बलाढ्य खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर (जि. अहमदनगर) येथे १० वीत शिकत असलेली प्रांजल ही मूळची सोलापूरची आहे. तिने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच रिदमिक जिम्नॅस्टिक खेळायला सुरुवात केली. २०१६ ते २०२१ या काळात तिने पुणे येथे रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकली. तिच्या याच अफाट क्षमतेमुळे २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तिची संपूर्ण महाराष्ट्रातून ‘सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून निवड करण्यात आली होती. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी प्रांजलने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, खेलो इंडिया, राज्य आणि जिल्हा पातळीवर मिळून ४० पेक्षा जास्त पदके (ज्यामध्ये बहुतांश सुवर्णपदके आहेत) जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी तिचे प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, लुल्लानगर, पुणे येथे झाले होते. प्रांजलच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचे प्रशिक्षक मंगेश खोपकर, ध्रुव ग्लोबल स्कूलचे संगमनेरचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी यांनी अभिनंदन केले.




















