टेंभुर्णी : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. चार दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्याची सांगता रामकथा वाचन, भारुड, पाळणा, आरती व महाप्रसादाने झाली. या कार्यक्रमाला हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती.
श्रीराम मंदिरात भगवान श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती असून येथे रामनवमीसह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. यावर्षी मंदिराच्या नूतनीकरणाची कामे—सभामंडप, शिखर, कंपाउंड व रंगरंगोटी—दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आल्याने उत्सव अधिकच भव्य आणि आकर्षक झाला.
या निमित्ताने पुणे येथील वासंती धर्माधिकारी यांनी तीन दिवस रामकथा सादर केली, तर सोलापूर येथील हभप कापसे महाराज यांच्या भारुडाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच हभप काजळे महाराज यांचे रामनवमीदिनी सुश्राव्य कीर्तन झाले. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे नूतन आयपीएस अधिकारी राहुल आत्राम यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
रामनवमीदिनी इंद्रजित बनसोडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच चार दिवस अन्नदान कार्यक्रमही राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी सौरभ हवालदार, ओंकार पांढरे, धोंडीराम कोठावळे, विलास कोठावळे, रमेश तिपाले यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदेव ट्रस्ट सदस्य व समस्त श्रीराम भक्त परिवार यांनी परिश्रम घेतले.
दानशूर व्यक्तींचा सन्मान
मंदिराच्या विकासासाठी मोठे योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. इंद्रजित बनसोडे व त्यांच्या पत्नी लता यांनी मंदिराचे शिखर, गाभारा, वॉल कंपाउंड, ग्रील व रंगकामासाठी सुमारे ८ ते ९ लाख रुपये खर्च केले. कॉक्रीटीकरणासाठी तानाजी भुजंग येवले-पाटील व त्यांच्या आई द्वारकाबाई यांनी योगदान दिले.
तसेच शिवाजी प्रकाश येवले-पाटील, सुरजभैय्या बाळासो देशमुख, नाना काळे, महेश अरुण थोरात, मुकुंद रामचंद्र सुतार, मोहन विठ्ठल काळे, शशिकांत देशमुख, अविनाश इंगळे, मंजुनाथ रेळेकर (मिस्त्री) आदींनी बांधकाम व इतर कामांसाठी मोलाचे सहकार्य केले. तिन्ही मूर्तींसाठी चांदीचे टोप व सीतामाईस मंगळसूत्र अर्पण केल्याबद्दल सतीश पोतदार व अनंत पोतदार यांचाही सन्मान करण्यात आला.
या उत्सवामुळे टेंभुर्णी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

















