बार्शी – भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि अतूट नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. सणाला. अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने बार्शी शहरातील श्री भगवंत मंदिर परिसर, महाद्वार चौक, सोमवार पेठ या भागात राख्यांचे छोटे स्टॉल, दुकाने विविध रंगांच्या आणि आकर्षक प्रकारांच्या राख्यांनी सजली असून, बहिणी भांवासाठी राखी खरेदी करण्यासाठी गर्दी करु लागल्या आहेत.
रक्षाबंधन हा केवळ भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा सण नसून भाऊ-बहिणीमधील प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देण्याची भावना दृढ करणारा सण मानला जातो. बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाची आणि सदैव साथ देण्याची भावना व्यक्त करतो. पूर्वी रक्षाबंधनासाठी साध्या स्पंजच्या लहान-मोठ्या आकारातील रंगीबेरंगी प्लास्टिकचे कागद लावलेल्या तसेच मोती किंवा छोट्या सजावटीच्या मण्यांनी तयार केलेल्या त्याचबरोबर स्वस्तिक, कलश, गणपती इत्यादी विविध प्रकारचे शुभचिन्हे लावलेल्या राख्यांना अधिक पसंती होती. ग्रामीण भागात घरच्या घरी साध्या धाग्यांपासून राख्या तयार करण्याचीही परंपरा होती.
आधुनिक काळात राख्यांच्या प्रकारात मोठे बदल झाले आहेत. कार्टून, सुपरहिरो, फुलांच्या आकारातील, मोत्यांच्या, स्टोन वर्क, कुंदन, रुद्राक्ष, चंदन तसेच विविध संदेश असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आणि सुपरहिरोच्या राख्यांना विशेष पसंती मिळत आहे. भावाच्या आवडीनुसार राखी निवडण्याकडे बहिणींचा कल वाढला आहे.
Post Views: 3