पंढरपूर – आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची नगरप्रदक्षिणा आता सुखकर होणार आहे. कारण शहरातील नगरप्रदक्षिणा रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्यांचे प्रमाण जास्त होते तेथे चक्क रस्त्याचे काम केले जात असल्याचे दिसत आहे. शहरातील नगरप्रदक्षिणेसह मुख्य रस्त्यांच्या दैयनीय अवस्थे बाबत दैनिक सोलापूर तरुण भारत मधून ८ जुलैच्या अंकात प्रशासनाला खडे बोल सुनावलेले होते. त्याची दखल घेवून प्रशासनाकडून त्वरीत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत.
आषाढी यात्रेसाठी यावर्षी ३० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकताच व्यक्त केलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने सध्या वारीची जोरदार तयारी सुरु केलेली आहे. दैनिक तरुण भारत मधून मंगळवारी ८ जुलैच्या अंकात मारीतसी बोंब, परी न ऐकती । उघडली दृष्टी, तरी न देखती ।। या मथळ्या खाली एकंदरीतच सरकारी बाबूंच्या कामकाजा बद्दल सडेतोड बातमी प्रसिध्द केलेली होती. त्या बातमीची दखल घेऊन प्रशासन यात्रेसाठीच्या कामाला अंगझटकुन लागल्याचे दिसत आहे.
कारण यात्रेच्या दृष्टीने शहरातील अत्यंत महत्वाचा असा नगरप्रदक्षिणा मार्गाचे काम सध्या प्रशासनाकडून हाती घेण्यात आल्याचे दिसत आहे. या रस्त्याचे शहरातील चौफाळा ते गांधीरोड या भागातील काम सध्या सुरु असल्याचे दिसत आहे. दोन दिवसापूर्वी नाथचौका पासून खाली घोंगडे गल्ली पर्यंतचे देखील काम करण्यात आलेले आहे. त्यामुळे संपुर्ण प्रदक्षिणा मार्गाचे काम येत्या दोन, तीन दिवसांमध्ये पुर्णत्वास जाईल असा विश्वास शासकीय आधिकाऱ्यांकडून दिला जात आहे. त्यामुळे भाविकांना या रस्त्यावरुन नगरप्रदक्षिणा करणे सुखकर होईल. त्या बरोबरच आषाढी एकादशी दिवशी शहरातील याच रस्त्यावरुन विविध संतांच्या दिंड्या, पालखी सोहळे तसेच आषाढी एकादशी दिवशी विठुरायाचा महाकाय रथ देखील याच रस्त्यांवरुन नगरप्रदक्षिणेसाठी जात असतो. या सर्वांच्या दृष्टीने हा रस्ता खड्डेमुक्त होणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाकडून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे शहरवासियां बरोबरच भाविकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.
——————-
चौकट : ( अनवाणी पायांनी नगरप्रदक्षिणा करताना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी )
आषाढी यात्रेसाठी येथे आलेले लाखों वारकरी चंद्रभागास्नान, विठुरायाचे दर्शन आणि नगरप्रदक्षिणा करीत असतात. या मध्ये महिला, पुरुष, लहानमुले आणि ज्येष्ठांचा देखील सहभाग असतो. विशेषत: नगरप्रदक्षिणा ही प्रामुख्याने अनवाणी पायांनी केली जाते. त्यामुळे भाविकांना या रस्त्यावरुन अनवाणी पायांनी चालताना देखील त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात यावी अशी मागणी देखील शहरवासीयांकडून केली जात आहे.
——————–
चौकट : ( एका पावसा नंतर रस्त्याच्या दर्जाबाबतची होईल शहानिशा)
प्रशासनाकडून आषाढी यात्रेसाठी नगरप्रदक्षिणा रस्त्यावरील खड्डे मुक्तीसाठी चांगलेच मनावर घेतल्याचे दिसत आहे. गेल्या तीन, चार दिवसांपासून या रस्त्याच्या विविध भागातील खड्डे मुक्त रस्ता केल्याचे दिसत आहे. जरी रस्ता करुन रस्त्यावरील खड्डे मुक्त झालेले दिसत असले तरी या रस्त्याच्या दर्जाबाबत एखादा पाऊस आल्याशिवाय कळणार नाही असे जाणकारांकडून बोलले जात आहे. त्यामुळे सध्या रस्ता जरी चकाचक दिसत असला तरी त्याच्या दर्जाबाबत एखादा पाऊस येवुन गेल्या शिवाय तो चांगल्या दर्जाचा झाला की वाईट यावर शिक्कामोर्तब होणार नाही.
———————
चौकट : ( रस्त्यावरील चेंबर्स अनेक ठिकाणी झालेली आहेत वरखाली )
नगरप्रदक्षिणा रस्ता हा यात्रेच्या काळातील शहरातील महत्वाचा रस्ता मानला जातो. कारण अनेक संतमहात्म्यांच्या दिंड्या, विठुरायाचा रथ याच मार्गावरुन मार्गक्रमण करीत असतो. त्यामुळे हा रस्ता खड्डे मुक्त होवुन एकसारखा असणे आवश्यक असते. कारण एकादशी दिवशी भाविकांची या रस्त्यावर गर्दी ऐवढी असते की भाविक चालत नसतो तर मागील भाविकांच्या गर्दीच्या रेट्यामुळे अक्षरश: तो पुढे ढकलला जाऊन तसाच पुढे पुढे जात असतो. त्यामुळे रस्ता एकसारखा असणे आवश्यक असते. मात्र जरी हा रस्ता खड्डेमुक्त दिसत असला तरी या रस्त्यावरील चेंबर्सची झाकणे खूपच वरती, खालती झालेली दिसत आहे. त्यामुळे चेंबर्सच्या ठिकाणी खड्डे दिसत आहे. ते देखील व्यवस्थित करणे आवश्यक आहे.
Post Views: 10