सांगोला – पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यात वाढत्या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत सांगोला शहर व परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन न चालविणे, तसेच निष्काळजी वाहन चालविण्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणारे आकर्षक फलक उभारण्यात आले आहेत. तसेच अपघातग्रस्त दुचाकी वाहन प्रदर्शित करून अपघाताच्या भीषण परिणामांची जाणीव नागरिकांना करून देण्यात येत आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करून स्वतःसह इतरांच्याही जीविताचे रक्षण करावे असे आवाहन सांगोला पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.