
सोलापूर – येथे सुरू असलेल्या ७९ व्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत आज खेळवल्या गेलेल्या सामन्यांमध्ये मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी आणि के पी क्रिकेट ॲकॅडमी (केपीसीए) या संघांनी आपापल्या सामन्यात विजय संपादन केले.
सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात ख्वाजा बंदेनवाज ‘ब’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७६ धावांचा मजबूत धावसंख्या उभारली. यात विवेक अंची याने ६९ धावांची आणि सुमित येवले याने ४७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. वैष्णव जावळेने १६ धावांचे योगदान दिले. ख्वाजा बंदेनवाज ‘ब’ कडून गोलंदाजीत जावद आली, जावेद अहमद, रिजवान आणि रितेश वाडकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ख्वाजा बंदेनवाज ‘ब’ संघाचा डाव १९.५ षटकांत १३४ धावांवर आटोपला. संघाकडून लखन चव्हाणने ४०, रितेश वाडकरने ३३ आणि शेख केफने २६ धावा केल्या. मॉडेल ॲकॅडमीकडून जयराज कुंमणे याने ४ षटकांत ३५ धावा देत ४ बळी घेतले. विवेक अंचीने २ बळी तर स्वराज वाले, सुमित अहिवळे आणि गौरव वाडे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने हा सामना ४२ धावांनी जिंकला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल विवेक अंची याला सामनावीर घोषित करण्यात आले. वरिष्ठ खेळाडू (मुंबई पोलीस/शिवाजी विद्यापीठ) सुधाकर सिद्धू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी विक्रांत पवार, वासुदेव धोरणाल, अतुल बांदेवाडीकर व सचिन गायकवाड उपस्थित होते. या सामन्यात मोहित दिकोंडा व शुभम मुतुर यांनी पंच म्हणून तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.
दुपारच्या सामन्यात ख्वाजा बंदेनवाज ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना के पी क्रिकेट ॲकॅडमीचा संघ २० षटकांत ११५ धावांवर सर्वबाद झाला. यात ओंकार कोरेने ३५, गौरी प्रसाद स्वामीने २५ आणि दिनेश शिंगाडेने १६ धावा केल्या. ख्वाजा बंदेनवाज ‘अ’ कडून नितेश वी. याने ४ षटकांत १५ धावा देऊन ३ बळी घेतले, तर जकवानने २ आणि कासिफ अहमदने १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ख्वाजा बंदेनवाज ‘अ’ चा डाव १४.१ षटकांत अवघ्या ८१ धावांत गडगडला. संघाकडून सईद जागीदारने २३, मिर्झा वसीमने १० आणि कासिफ अहमदने १० धावा केल्या. केपीसीएकडून दिनेश शिंगाडेने घातक गोलंदाजी करत ४ षटकांत १६ धावा देऊन ४ बळी घेतले. यश मंगरूळेने २, तर श्रेयस सुरवसे आणि सनी पोळ यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. के पी क्रिकेट ॲकॅडमीने या सामन्यात ३४ धावांनी विजय मिळवला. ४ बळी आणि १६ धावा करणाऱ्या दिनेश शिंगाडे याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. वरिष्ठ खेळाडू अंबादास तोरा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लियाकत शेख, अतुल बंदेवाडीकर आणि सचिन गायकवाड उपस्थित होते. या सामन्यात महेश सोनवणे व शुभम मुतुर यांनी पंच म्हणून तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.
आजचे सामने
- सकाळी : सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट ‘बी’ विरुद्ध श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब, अक्कलकोट.
- दुपारी : के पी सी ए विरुद्ध साऊथ सोलापूर आपटे.





















