
सोलापूर – यंदाच्या आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन कमी वेळेत आणि अधिक सुलभ व्हावे, यासाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा तसेच मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने कायम ठेवला आहे. मागील वर्षी या निर्णयामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ तब्बल पाच ते सहा तासांनी कमी झाला होता. त्यामुळे यंदाही भाविकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
आषाढी वारी नियोजनाबाबत केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे यांनी सर्व विभागांना समन्वयातून काम करण्याचे निर्देश देताना, मागील वर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना कोणताही त्रास होणार नाही.
यासाठी प्रशासनाने प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत पंढरपूर शहर, वाखरी पालखी तळ, ६५ एकर परिसर आणि वाळवंट भागात कायमस्वरूपी व तात्पुरत्या शौचालयांची नियमित स्वच्छता, महिला स्नानगृहे, हिरकणी कक्ष, पुरेसे सफाई कर्मचारी आणि अखंड पाणी-वीज पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
रस्ते दुरुस्ती, खड्डेमुक्ती आणि पालखी मार्गावरील सुविधा वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदांनी समन्वय साधून पालखीच्या प्रत्येक मुक्कामस्थळी दोन दिवस आधी शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. चंद्रभागा नदीपात्रातील खड्डे तातडीने बुजविणे, नदीत वेळेवर पाणी सोडण्याचे नियोजन, पालखी मार्गावरील विहिरींना सुरक्षित बॅरिकेडिंग आणि मोठ्या दिशादर्शक फलकांची उभारणी करण्यावरही त्यांनी भर दिला.
आरोग्य विभागाने पालखीसोबत वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत, आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, तर महावितरणने २४ तास मनुष्यबळ सज्ज ठेवावे, असे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री आरोग्य रथ, वारकरी सेवा सुविधा केंद्र, राष्ट्रीय महामार्गावरील स्वच्छता, प्रकाशयोजना आणि वृक्षारोपणाची कामेही वेळेत पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी एसटी स्थानक परिसरातील स्वच्छता वाढविणे, अतिरिक्त सफाई कर्मचारी नियुक्त करणे आणि वारीदरम्यान उद्भवणाऱ्या मोबाईल नेटवर्क समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली.
चौकट
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व विभागांच्या समन्वयातून यंदाची वारी यशस्वी करण्याचा विश्वास व्यक्त केला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगितले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषदेकडून पालखी मार्गावरील सुविधा उभारणीची कामे वेगाने सुरू असल्याची माहिती दिली. बैठकीत मंदिर समिती, आरोग्य, पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग, वीज वितरण आदी विभागांनीही आपल्या नियोजनाचा सविस्तर आढावा सादर केला.