सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील १६५ गावे आणि ८५३ वाड्यांमधील नागरिकांना आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सोमवारअखेर जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ४३ नागरिक आणि ९८ हजार ९५९ पशुधनासाठी १७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून प्रशासनाने ४४ विहिरी आणि २६ बोअरवेल असे एकूण ७० जलस्रोत अधिग्रहित केले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याची तीव्रता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे. अनेक गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेषतः मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांत टँकरची संख्या सर्वाधिक असून, या भागांतील पाणीटंचाईची तीव्रता आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील ४२ गावांसाठी ४५ टँकर, तर सांगोला तालुक्यातील २८ गावांसाठी ३९ टँकर सुरू आहेत. त्याखालोखाल माढा तालुक्यात १५ गावांसाठी १९ टँकर, उत्तर सोलापूर तालुक्यात नऊ गावांसाठी १६ टँकर आणि अक्कलकोट तालुक्यात १८ गावांसाठी १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
माळशिरस तालुक्यातील ११ गावांसाठी ११, मोहोळ तालुक्यातील सात गावांसाठी ११, करमाळा तालुक्यातील १३ गावांसाठी १० आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावांसाठी १० टँकर सुरू आहेत. बार्शी तालुक्यातील १५ गावांसाठी चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असताना पंढरपूर तालुक्यात मात्र अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे उपलब्ध आकडेवारीनुसार, या तालुक्याला सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. मात्र, आगामी काळात पाण्याची उपलब्धता आणि मागणी यावर परिस्थिती अवलंबून राहणार आहे.पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिक आणि पशुधनाला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर व पर्यायी जलस्रोतांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.
चौकट
जलस्रोत अधिग्रहणातून पर्यायी व्यवस्था
पाणीटंचाईग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून टँकरबरोबरच विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७० जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत. टँकरचे वेळापत्रक, पाणीपुरवठ्याची नियमितता आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर यांना या काळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. राठोड यांनी ही माहिती दिली.