माळशिरस – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सोमवार दिनांक २० जुलै रोजी माळशिरस मुक्कामी येत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस कार्तिकेन यांनी माळशिरस येथे पालखी मुक्काम ठिकाणी भेट देऊन माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्याकडून कामाची माहिती घेऊन दर्जेदार कामे झाली पाहिजेत ,संध्याकाळ पर्यंत कसे काम करणार याचा आढावा देण्यास सांगून १८ जुलै रोजी पाहणी करणार असल्याचे सांगितले. केलेले कामाबाबत असमाधान व्यक्त केले.
यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर ,तहसीलदार सुरेश शेजुळ, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे ,नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण, मुख्याधिकारी सुमित जाधव, डेप्युटी इंजिनियर गोविंद कर्णवर, सुरज ठवरे ,नायब तहसीलदार अमोल कदम ,बांधकाम कनिष्ठ अभियंता सायली पराडे आदी उपस्थित होते.
माळशिरस नगरपंचायतीला पालखी सोहळ्यासाठी ४६ लाख रुपये आले आहेत या आलेल्या रकमेतून पालखी सोहळ्यासाठी तसेच मुक्काम तळावर काय काय सुविधा करण्यात येणार याचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी त्यांनी अनेक कामांची सखोल चौकशी करून या कामासाठी किती निधी वापरणार याचा आढावा घेतला . आराखडा व्यवस्थित न केल्याने नाराजी व्यक्त करून ती कामे कशी करणार व त्यासाठी किती निधी वापरणार हे मला आज संध्याकाळी पंढरपूर येथे येऊन दाखवा व केलेले काम हे चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे मी १८ जुलै रोजी काम पाहण्या साठी परत येणार असून त्यावेळी सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत व कामाचा दर्जा चांगला झाला पाहिजे अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या
यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी बॅरिकेटिंग, स्वागत कमान ,आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही ,पालखी तळावर चार एलईडी मोठे टीव्ही, पाणीपुरवठा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली .