नागपूर – महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्याचा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले आहे. विरोधी पक्षातील आमदारांना चहापानासाठी सरकारकडून व्यक्तिगत आमंत्रण देण्यात आले. पण विरोधी पक्षनेते या संवैधानिक पदावर नेमणूक न करणारे सरकार संविधान विरोधी असल्याची टीका करत महाविकास आघाडीने रविवारी चहापानावर बहिष्कार टाकला.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक नागपूर विधानभवनात पार पडली.यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विरोधी पक्षनेते पदी नेमणुकीबाबत केलेल्या स्वातंत्र्यनंतर सर्वच प्रथा पाळणे अभिप्रेत नाही, या विधानाचा विरोधकांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. राज्यात दिवसाला ८ शेतकऱ्यांचे आत्महत्या होत आहे. निवडणुकीच्या आधी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली पण त्याला सरकारला मुहूर्त सापडत नाही. दुसरीकडे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना फुकटे म्हणाले. मंत्री विखे- पाटील यांनी देखील शेतकऱ्यांचा अपमान केला. यातून सरकारची शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा असंवेदनशील सरकार बरोबर चहापान करणे चुकीचे आहे अशी टीका विरोधकांनी केली.
विदर्भातील कापूस, सोयाबीन,धान उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात नाही. परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस आयात केला जात असून त्याचा आयात कर शून्य केला आहे.सोयाबीनला हमीभाव मिळत नाही,सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलेलं नाही.तर धानाला बोनस देण्यात आलेला नाही,अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली. राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे ७५.४२ लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. शेतजमीन, जनावर,घरांचे नुकसान झाले. यासाठी केंद्राकडून मदत अपेक्षित असताना २७ नोव्हेंबरला राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला. केंद्राकडून महाराष्ट्राला एक पैशाची मदत झालेली नसल्याचे सांगून विजय वडेट्टीवार म्हणाले,’ उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने महार वतनाची जमीन नियमबाह्य पद्धतीने खरेदी केली. याप्रकरणी शीतल तेजवानी हिला अधिवेशनाच्या तोंडावर कारवाई केली दाखवण्यासाठी अटक करण्यात आलीं.जमीन विकली त्यांच्यावर कारवाई झाली पण जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई होत नाही हा महायुती सरकारचा अजब न्याय आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
भास्कर जाधव म्हणाले,’ महायुती सरकारकडे पाशवी बहुमत असताना विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सगळे मंत्री कंत्राटदार बनून तिजोरी लुटत आहे. तिन्ही पक्षात भ्रष्टाचार सगळ्यात जास्त कोण करणार यात त्यांची स्पर्धा सुरू आहे. या सरकारने अनेक योजना बंद केल्या. हे स्थगिती सरकार नाही का? असा सवाल करून त्यांनी राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटले हे त्यांच्याच आमदारांनी शूटिंग करून दाखवले.ही कोणती लोकशाही आहे? अशी विचारणा केली.
‘मविआ’च्या बैठकीला काँग्रेसकडून वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत , आ. अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे, ठाकरे गटाचे भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब उपस्थित होते.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.



















