सोलापूर – शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) परिसरात संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलाच्या वतीने “स्वच्छ जल, स्वच्छ मन” या अभियानांतर्गत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात युनिटी लेक व्ह्यू बोट क्लबच्या प्रवेशद्वारापासून धोबीघाट परिसरातील वॉकिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी सखोल साफसफाई करण्यात आली.
तलावाच्या किनाऱ्यावर साचलेला कचरा, टाकून दिलेले कपडे, प्लास्टिकच्या बाटल्या व इतर घनकचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेतून तब्बल ८ टन कचरा संकलित करण्यात आला असून महानगरपालिकेच्या सहा घंटागाड्यांमार्फत तो उचलण्यात आला. या अभियानास प्रोत्साहन देताना सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी संत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत मिशनने राबवलेले हे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. “आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच परिसर स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. सजग नागरिकत्व आणि सातत्यपूर्ण जनजागृती ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच इतर सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेऊन अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करत महानगरपालिकेचे आवश्यक ते सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
या मोहिमेत संत निरंकारी मिशनचे क्षेत्रीय प्रभारी इंद्रपालसिंह नागपाल, पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी, प्रभाग २६ नगरसेविका संगीता शंकर जाधव, प्रभाग २१ नगरसेविका संगीता जाधव, विभागीय अधिकारी किशोर तळीखेडे, मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सुमारे ३०० सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. तत्पूर्वी या परिसरात संत निरंकारी मंडळाचे सत्संग देखील संपन्न झाले. यावेळी इंद्रपाल सिंह नागपाल यांनी आपल्या मधुर वाणीने सेवेचे महत्त्व स्पष्ट केले. उपक्रमामुळे तलाव परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनला आहे. यावेळी संत निरंकारी मंडळाचे सेवा दल तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
























