सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर चालू असलेल्या कर्नल सी के नायुडू चषकातील एलिट उपांत्यपूर्व फेरीचा सामना चौथ्या दिवशी चहापानाच्या काही वेळ आधी अनिर्णित संपला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरला असून १ मार्च पासून पुण्यात पुढील सामना होणार आहे.
महाराष्ट्राचा दुसरा डाव कालच्या धावसंख्येवरून पुढे सुरू झाल्यावर सकाळच्या सत्रात प्रथम विकी ओस्तवाल ने त्याचे शानदार शतक पूर्ण केले आणि दिग्विजय सोबत 91 धावांची भागीदारी रचली. शुभ शर्मा ने दिग्विजय पाटील (18) याला झेल बाद करत जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णी ने आल्यापासून फटकेबाजीला सुरुवात केली आणि संघाची धावसंख्या 200 पार नेली. चौथ्या विकेटसाठी 13 षटकात 73 धावांची भागीदारी करताना 48 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार लगावत 47 धावा करून आर्शिन मनिषीच्या फिरकीच्या जाळ्यात फसला. त्यानंतर आलेला हर्ष मोगावीरा सोबत विकी ओस्तवाल ने दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. कौनैन कुरेशी ने आधी हर्ष मोगावीरा (26) आणि विकी ओस्तवाल (141 धावा, 177 चेंडू, 12 चौकार, 6 षटकार) यांना 17 धावांच्या फरकाने बाद केले. 23 धावांची भर पडल्यावर जेवणाला खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने 64 षटके खेळून काढत 6 बाद 336 धावा केल्या होत्या तेव्हा किरण चोरमले (23) आणि साहिल औताडे (10) खेळपट्टीवर नाबाद होते व महाराष्ट्राने तब्बल 521 धावांची आघाडी घेतली होती त्यामुळे सामना अनिर्णित अवस्थेत झुकला होता.
दुपारच्या सत्रात मात्र पुढील महंत्वपूर्ण सामन्याच्या आधी कसून फलंदाजी म्हणून महाराष्ट्राने डाव पुढे सुरू ठेवला. 7 व्या विकेट साठी 68 धावांची भागीदारी रचल्यावर मनिषी याला उंच फटका मारण्याच्या नादात साहिल औताडे (38) आणि 6 चेंडू नंतर कुरेशी याला षटकार मारण्याच्या नादात किरण चोरमले (40) झेलबाद झाले.
त्यानंतर मात्र पुढील 9 षटके अत्यंत संथ फलंदाजी करत केवळ 8 धावा करत अजय बोरुडे आणि वैभव दारकुंडे यांनी खेळपट्टीवर टिकून रहाण्याची भूमिका स्वीकारली. दुसऱ्या डावात 84 षटके खेळून काढत 8 बाद 389 धावा झाल्या असताना चहापानाला काही वेळ शिल्लक असताना पंचांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुढे खेळ चालू ठेवायचा की कसे याबाबत विचारणा केली असता सामना थांबविण्याबाबत निर्णय घेतला आणि सामना अनिर्णित अवस्थेत संपला. झारखंड कडून कौनैन कुरेशी 88/4, मनिषी 123/2, शुभ शर्मा आणि अमित कुमार यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
स्पर्धेच्या नियमानुसार पहिल्या डावात आघाडी घेतल्याने महाराष्ट्र संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरला. सामना संपल्यावर लगेच सामनाधिकारी यांनी सामनावीर पुरस्कार महाराष्ट्र कर्णधार सचिन धस याला त्याच्या 222 व 33 धावांच्या खेळाबद्दल जाहीर करत BCCI तर्फे 25,000₹ चा धनादेश देत पुरस्कृत केले तेंव्हा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवत त्याचे अभिनंदन केले.
सोलापूरचे मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी लकी
बीसीसीआयच्या च्या 2025-26 ह्या देशांतर्गत स्थानिक क्रिकेट स्पर्धातील कूच बिहार मधील हिमाचल प्रदेश सोबतचा सामना आणि कर्नल सी के नायुडू चषकातील 3 सामने सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर (त्रिपुरा, पाँडिचेरी, झारखंड विरुद्ध) झाले आणि सर्व सामन्यात महाराष्ट्राने विजय मिळवले असून, येथील उत्तम खेळपट्टी आणि आयोजन नियोजन मुळे खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांची प्रथम पसंती मुळे सोलापूरचे मैदान हे राज्य क्रिकेट संघटने साठी लकी ठरले असल्याचे दिसून येते.






















