मंद्रूप – दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथील श्री हनुमान यात्रेस आजपासून प्रारंभ होत असून ही यात्रा चार दिवस चालणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. १ एप्रिल) रोजी सायंकाळी श्री हनुमान व जिवाजी मास्तर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार असून देवतांना तेलाभिषेक करण्यात येईल. गुरुवारी पहाटे रुद्राभिषेकानंतर नंदीध्वज व पालखीची मिरवणूक काढण्यात येणार असून दहीहंडी कार्यक्रमही होणार आहे. दिवसभर कर्नाटकातील सुप्रसिद्ध ढोलकी कार्यक्रम तसेच रात्री प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवारी शोभेचे दारूकाम, आध्यात्मिक विषयावरील प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी ढोलकी कार्यक्रम, तालुक्यातील नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्या तसेच “माता तप्पीदा मैदन… अर्थात देवरहंता अण्णा” हे कन्नड सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे.
दररोज रात्री महातेंश हिरेमठ महास्वामीजी (तद्देवाडी) यांचे आध्यात्मिक जीवनावर प्रवचन होणार असून यात्रेदरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


















