बार्शी – जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर व अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्म कल्याणक दिवस मंगळवारी रोजी बार्शीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकल जैन समाजाच्यावतीने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने श्री वर्धमान जैन स्थानक येथून भगवान महावीरांच्या प्रतिमेसह फुलांनी सजवलेल्या रथातून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. सवाद्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरुन मार्गक्रमण करत श्री जैन श्वेतांबर ऋषभदेव मंदिर येथे विसर्जित झाली. शोभायात्रेदरम्यान शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करुन स्वागत केले.
ज्या भागांत शोभायात्रा पोहोचू शकली नाही, तेथे युवक-युवतींनी ‘अहिंसा मोटरसायकल रॅली’ काढून भगवान महावीरांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.
रक्तदान शिबिरात ७८ जणांचा सहभाग
भगवान महावीर स्वामी जयंतीनिमित्त श्री वर्धमान नवयुवक मंडळ व रामभाई शहा रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. युवकांसह महिला वर्गानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महाप्रसादाचे वाटप
स्व. पन्नालालजी मोहनलालजी श्रीश्रीमाळ यांच्या स्मरणार्थ समाज बांधवांसाठी पारंपरिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
जैन समाजाचे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम
जैन समाजाच्या वतीने वर्षभर “जिवदया”, ‘जैन झुणका भाकर केंद्र’, “श्री महावीर धर्मार्थ दवाखाना” तसेच “श्री नवकार जैन सेवातीर्थ” अंतर्गत सुमारे २५० गायींचे संगोपन असे विविध सेवाभावी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या उत्सवाला आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, वर्षाताई ठोंबरे, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांनी भेट देऊन समाजाला शुभेच्छा दिल्या.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध जैन संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. यात ट्रस्टी अध्यक्ष सुमतीलाल मुनोत, शैलेश वखारिया, स्थानकवासी संघाचे अध्यक्ष जयचंद सुराणा, सचिव दिनेश श्रीश्रीमाळ, पदमचंद कांकरिया, अशोक श्रीश्रीमाळ, राहुल कुंकूलोळ, सेवा संघाचे अध्यक्ष सुभाष लोढा, महेश बाफना, वाचनालयाचे अध्यक्ष किशोर (बाळासाहेब) श्रीश्रीमाळ, आनंद पुनमिया, धीरज कुंकूलोळ, तसेच इतर समाजबंधूंचा समावेश होता.
















