वेळापूर – येथील सेंट जॉन्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहात संपन्न झाली. शाळेचे संस्थापक सर सोमी जॉन व मुख्याध्यापिका मिस शिजी जॉर्ज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मिस शिजी जॉर्ज यांनी करून शाळेचा वार्षिक लेखाजोखा मांडला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए.पी.आय. आशिष कांबळे, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, बार्शीचे मुख्याध्यापक फादर वर्गीस ऑगस्टी तसेच वेळापूर गावचे सरपंच रजनीश बनसोडे उपस्थित होते. यावेळी शाळेचे संस्थापक सोमी जॉन यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील इयत्ता यू.के.जी. व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन रॉब परिधान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना ए.पी.आय. आशिष कांबळे म्हणाले की, “विद्यार्थी जीवन ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची पायरी असते. या टप्प्यावर मिळालेले संस्कार, केलेले कष्ट आणि शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन हेच पुढील आयुष्याचा भक्कम पाया घडवतात. शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आणि समाजात जबाबदार नागरिक म्हणून उभे राहण्यासाठी असते.”
ते पुढे म्हणाले, “आज तुम्ही ग्रॅज्युएशनचा टप्पा पार करत आहात, हा तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मात्र हा शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आयुष्यात मोठी स्वप्ने पाहा, त्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करा आणि आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे व समाजाचे नाव उज्ज्वल करा. आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे शिक्षणासोबत शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणे अत्यंत आवश्यक आहे.”
शेवटी त्यांनी शाळेचे संस्थापक सर सोमी जॉन, मुख्याध्यापिका मिस शिजी जॉर्ज तसेच सर्व शिक्षकवृंदांचे कौतुक करत सांगितले की, “अशा प्रकारचे शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. या शाळेने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संस्कार आणि गुणवत्ता रुजवण्याचे उत्कृष्ट कार्य केले आहे.”
या कार्यक्रमात इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी नृत्य व नाटकाचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचा आनंद उपस्थितांनी द्विगुणित केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी जिया माने व साक्षी पिंजारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे संस्थापक सर सोमी जॉन यांनी केले.


















