टेंभुर्णी – कुर्डूवाडी रोडवर असलेल्या टेंभुर्णी एमआयडीसीतील श्री कृष्णा इम्पेक्स वेंचुरेस लिमिटेड (एस के बनाना) या कंपनीकडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पैसे थकवल्याचा आरोप होत असून, संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय (बाबा) कोकाटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
टेंभुर्णी, माढा, करमाळा, माळशिरस व इंदापूर परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून वेंडरमार्फत उधारीवर केळी खरेदी करून परदेशात निर्यात करण्याचा संबंधित कंपनीचा व्यवसाय असल्याचे निवेदनात नमूद आहे. यासाठी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना वेंडर म्हणून कामाला लावले जात असून, शेतातून केळी काढणे व बॉक्स पॅकिंग करून कंपनीला पुरवठा करण्याचे काम त्यांच्याकडून करून घेतले जाते. मात्र, कंपनी व वेंडर यांच्यात कोणताही लेखी करार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, कंपनी आवश्यकतेपेक्षा जास्त वेंडर तयार करून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर खरेदी करते आणि नंतर त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांचे पैसे थकवते. अलीकडे सुमारे २५ वेंडरांनी कोकाटे यांच्याकडे तक्रार केली असून, विविध वेंडरमार्फत शेतकऱ्यांचे सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंत देणे थकले असल्याचा दावा करण्यात आला आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून देयके न मिळाल्याने शेतकरी व वेंडर दोघेही आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
एका बाजूला शेतकरी पैशासाठी वेंडरांकडे पाठपुरावा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला कंपनीकडून पैसे मिळत नसल्याने वेंडर युवकांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे. काहींवर आत्महत्येची वेळ येत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
कंपनी जुने वेंडरांचे पैसे न देता नवीन वेंडर तयार करून अधिक खरेदी करत असल्याचा आरोप करत, शेवटी मोठी थकबाकी ठेवून कंपनी येथून निघून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कंपनीची मालमत्ता मर्यादित असून, बँकांचे कर्ज आणि शेतकऱ्यांचे मोठे देणे यामध्ये तफावत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संजय (बाबा) कोकाटे यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कंपनीकडून थकीत देयके वसूल करावीत, तोपर्यंत नवीन केळी खरेदी थांबवावी आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच, येत्या ३१ मार्चपर्यंत देणे न दिल्यास कंपनीला खरेदी-विक्री करू देणार नाही, तसेच कोल्ड स्टोरेजमधील माल बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा संजय (बाबा) कोकाटे यांनी दिला आहे. त्यातून होणाऱ्या नुकसानीस कंपनीच जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Post Views: 5