सोलापूर – दहावीच्या निकालानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू झाली असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने वर्ष २०२६-२७ साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी अर्ज नोंदणी, पसंतीक्रम भरणे, गुणवत्ता यादी आणि प्रत्यक्ष प्रवेश अशा सर्व टप्प्यांचे वेळापत्रक निश्चित झाल्याने विद्यार्थी व पालकांचे लक्ष आता प्रवेश प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे.
सध्या नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जाच्या भाग-१ मधील दुरुस्त्या आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू असून, ही मुदत २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे “कोणत्या कॉलेजला पहिली पसंती द्यायची?” याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि संभ्रमही दिसून येत आहे.
शिक्षण विभागाकडून २३ मे ते २६ मेदरम्यान विद्यार्थ्यांचे गुण, आरक्षण आणि पसंतीक्रम यांच्या आधारे अंतर्गत पडताळणी आणि जागा वाटप प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर पहिल्या गुणवत्ता फेरीतील प्रवेश यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना २६ ते २८ मेदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
यावेळी प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन मान्यता देण्याची अटही महत्त्वाची ठरणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले महाविद्यालय मान्य असल्यास स्वतःच्या लॉगिनमधून ‘प्रवेशासाठी पुढे जा’ हा पर्याय निवडणे बंधनकारक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच प्रत्यक्ष प्रवेश ग्राह्य धरला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पहिल्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार असून, दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक ३० मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची संधी उपलब्ध राहणार आहे.
कोट
पहिली फेरी संपल्यानंतर कोणत्या महाविद्यालयात किती जागा शिल्लक राहिल्या, याचा रिक्त जागांचा तपशील २९ मे २०२६ रोजी जाहीर केला जाईल. त्यानंतर लगेचच ३० मे २०२६ रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक कार्यवाही शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण करावी.
– सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सोलापूर
Post Views: 32