वेळापूर – सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ वेळापूर, ता माळशिरस येथील इंद्रनील मंगल कार्यालय येथे आज दि 20 मे रोजी सकाळी 9.30 वाजता भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती विक्रमसिंह माने देशमुख यांनी दिली.
राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या ‘शक्तीपीठ महामार्गा’वरून सध्या सोलापूर जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे. विशेषतः माळशिरस तालुक्यातील निमगाव (मगराचे) हे गाव या महामार्गाच्या वादाचे मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. या महामार्गाला होणारा तीव्र विरोध आणि त्याला मिळणारे समर्थन, या दोन्ही बाजूंच्या हालचाली याच गावातून सुरू झाल्या होत्या.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महामार्गाची सद्यः स्थिती, मोबदल्याचे निकष, अंतरणास, सर्व्हिस रोड, संयुक्त मोजणी आणि नुकसानभरपाई याबाबत संभाव्य बाधित शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती देण्यात आली होती.
अकलूज नंतर आता वेळापूर येथेही शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून याठिकाणीही महामार्ग बद्दल माहिती, अडचणी, शासन दरबारी करण्यात येणारे प्रयत्न व फायदा आदींबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार असल्याचे व त्यांच्या अडचणींचे निरसन करण्यात येणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन विक्रमसिंह माने देशमुख यांनी केले आहे.
Post Views: 32