सोलापूर : मी सामान्य जनतेचा पोस्टमन आहे आणि त्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सरकारदरबारी पोहोचविणे ही माझी जबाबदारी आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
सोलापुरात आज एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. गोरे म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील काय बोलतात, याला उत्तर देण्यास मी बांधील नाही. मला प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार आहे की नाही, हेही मला माहिती नाही. मात्र सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोस्टमन, आमदार किंवा पालकमंत्री अशा कोणत्याही भूमिकेत काम करावे लागले तरी त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही.
विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी ६१६ मतदार आहेत. विजयासाठी आवश्यक मतदान आमच्याकडे आधीपासूनच आहे. महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असून ‘अबकी बार ५०० पार’ हा आमचा संकल्प आहे, असे ते म्हणाले.
देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना गोरे यांनी, जनसामान्यांना बळ देणारे आणि भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करणारे नरेंद्र मोदी देशाला लाभले आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी श्री सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना केली आहे, असे सांगितले. तसेच ग्रामपंचायतींना लवकरच लोकनियुक्त संस्था मिळाव्यात यासाठी निवडणुका घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डीसीसी बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर बोलताना गोरे म्हणाले, राजेंद्र राऊत यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला म्हणून त्यांना मतदान मिळणार नाही, असा वातावरणनिर्मितीचा प्रयत्न होत आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलल्याने मते वाढतात की कमी होतात, हे जनताच ठरवेल. ज्यांनी गैरव्यवहार केलेला नाही, त्या संचालकांना चौकशीची भीती नाही. उलट चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी त्यांचीच भूमिका आहे.
Post Views: 10