
सोलापूर – केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत सोलापूर जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. सोलापूर जिल्हा राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जात आहे. यामध्ये मोहिमेत माळशिरस तालुक्यानेही विशेष योगदान दिले आहे. पुरणंदवडे येथील अवघ्या ७ महिन्यांच्या अनिका मयूर तांबडे या चिमुकलीचे आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात आले असून, राज्यातील सर्वात कमी वयाच्या लाभार्थ्यांपैकी तिची नोंद झाली आहे. तर सर्वात ज्येष्ठ तांदुळवाडी येथील १०१ वर्षीय जानुकाबाई सीताराम सुर्वे यांचेही आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात कमी वयाच्या आणि सर्वाधिक वयाच्या लाभार्थ्यांचे कार्ड तयार करण्यामध्ये सोलापूर जिल्ह्याने विशेष नोंद केली आहे.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, मुख्यकार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख ९१ हजार ९९६ लाभार्थ्यांच्या उद्दिष्टापैकी १६ लाख १९ हजार ५११ नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांत मोहिमेला विशेष गती मिळाली आहे. अवघ्या पाच दिवसात सुमारे एक वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यात यश मिळाले आहे.
जिल्ह्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, आरोग्य विभागातील अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान दि. ८ जून आणि ९ जून २०२६ रोजी सलग दोन दिवस दररोज सुमारे ६ हजार ५०० आयुष्मान भारत कार्डे तयार करण्याची उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला वेग आला आहे.
दरम्यान, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी निश्चित मर्यादेपर्यंत मोफत आरोग्य उपचारांची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे प्रत्येक पात्र कुटुंबाने आपले आयुष्मान भारत कार्ड तातडीने तयार करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरपोच सेवेमुळे या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोट
राज्यात सोलापूर जिल्ह्याचा नवा विक्रम
आयुष्मान भारत कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट दि. ६ जून ते १० जून या कालावधीत २० हजार इतके ठेवण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण भागात आशा वर्कर आणि आरोग्य सेविका कार्यरत करण्यात आल्या होत्या. या विशेष मोहिमेत राज्यातील सर्वात लहान लाभार्थी आणि सर्वात ज्येष्ठ लाभार्थ्याची नोंद सोलापूर जिल्ह्यात झालेली आहे. आयुष्यमान भारत कार्ड पूर्ततेसाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गावागावांत विशेष शिबिरे, घरभेटी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
– डॉ.सतीश कोपूरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी
चौकट
रेशनिंग कार्ड ऑनलाईन करून ई के.वाय.सी आवश्यक
आयुष्मान कार्डमुळे पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. उर्वरित नागरिकांनीही आपले रेशनिंग कार्ड ऑनलाईन करून ई – के.वाय. सी लवकरात लवकर करून आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.आयुष्मान भारत कार्ड निर्मितीच्या मोहिमेत सोलापूर जिल्ह्याने दाखविलेली ही गती आणि सर्वसमावेशकता राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.
Post Views: 34