पिलीव – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दि. २८ जून २०२६ रोजी पिलीव ता माळशिरस येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ अत्यंत उत्साहात करण्यात आला. माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती मनिषाताई अमोल मदने-पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जाधव, आरोग्य सहाय्यिका श्रीम. शेवाळे एस. पी.,औषध निर्माण अधिकारी विलास करे, आरोग्य सेविका श्रीम.दिवाणजी ए. जे., आरोग्य सेवक सचिन पिसे यांच्यासह आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पिलीव आणि परिसरातील ५,२१० लहान लाभार्थ्यांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. आरोग्य विभागाने अत्यंत चोख नियोजन केल्यामुळे पहिल्याच दिवशी तब्बल ९२.३७% कामाचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी परिसरातील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांचे विशेष सहकार्य लाभले. पालकांनीही आपल्या ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ डोस देऊन या राष्ट्रीय मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चौकट
वंचित बालकांसाठी ‘घरोघरी मोहीम’
”पहिल्या दिवशी जे बालके काही कारणास्तव पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहिली आहेत, अशा सर्व बालकांचा शोध घेऊन त्यांना पुढील ३ दिवसांत आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन पोलिओ डोस पाजण्यात येईल. परिसरातील एकही बालक या सुरक्षेपासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.”
डॉ. विलास जाधव (वैद्यकीय अधिकारी)