सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे २० कोटी रुपये आणि जीएसटी अनुदानातील १० कोटी रुपये असे एकूण ३० कोटी रुपये खासगी बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतच मुदतठेव स्वरूपात गुंतवावेत, अशी मागणी महापालिका कामगार व समाज कल्याण समितीच्या सभापती श्रद्धा पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवार, १० जुलै रोजी होणार असून या बैठकीत विविध निधींच्या मुदतठेवीबाबत निर्णय अपेक्षित आहे. यासाठी महापालिकेने राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांकडून व्याजदर मागविले होते. त्यामध्ये खासगी क्षेत्रातील बंधन बँकेने सर्वाधिक ७ टक्के वार्षिक व्याजदर देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्यांच्या आयुष्यभराच्या बचतीशी संबंधित असल्याने तो खासगी बँकेत ठेवणे धोकादायक ठरू शकते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. काही खासगी बँकांवर आर्थिक संकट ओढवल्याची उदाहरणे देत कर्मचाऱ्यांच्या निधीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
त्यामुळे केवळ अधिक व्याजाच्या मोहापायी निर्णय न घेता, कर्मचारी हित आणि निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निधी राष्ट्रीयकृत बँकेतच ठेवावा. तसेच ३० जून रोजी सादर झालेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी देऊ नये, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनामुळे स्थायी समितीच्या बैठकीत ३० कोटी रुपयांच्या मुदतठेवीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणता निर्णय घेतात, याकडे महापालिका कर्मचारी आणि शहराचे लक्ष लागले आहे.
Post Views: 8