सोलापूर – महाराष्ट्र शासनाने सन २०२६ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिनांच्या शासकीय कार्यक्रमांच्या यादीत माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश केला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले असून, २२ जुलै रोजी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यापूर्वी जयंती व राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमाबाबत काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकात सुधारणा करत हा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार २२ जुलै २०२६ रोजी, बुधवार या दिवशी स्व. अजित अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
शासनाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना आवश्यक सूचना देऊन या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हे परिपत्रक राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित कार्यालयांमध्ये २२ जुलै रोजी स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित जयंतीला अधिकृत शासकीय मान्यता मिळाल्याची चर्चा प्रशासन व राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.