सांगोला – तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके यांचा ४५ वा स्मृती समारोह व चालू वर्ष हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव प्रशांत मस्के, प्राचार्य चारुदत्त जगताप उपस्थित होते.
या स्मृती समारोहाच्या निमित्ताने शुक्रवार दि.४ ते रविवार दि.६ सप्टेंबर या कालावधीत पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन सांगोला विद्यामंदिर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि.४ सप्टेंबर रोजी स.१० वा. क्रीडा व युवक सेवा, पुणे विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांच्या शुभहस्ते व सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे आणि सांगोला तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि.६ सप्टेंबर रोजी सायं.५ वा. आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४-ड१ प्रांतपाल राजेंद्र शहा-कांसवा आणि लायन्स विभागीय सभापती महेश नळे यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे माजी खजिनदार अनुप राजुरकर (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उद्योगपती सिद्धार्थ झपके, विलास क्षीरसागर, सुहास होनराव, ज्ञानेश्वर तेली, नागेश तेली, श्रीकांत देशपांडे, मंगेश म्हमाणे, रत्नाकर ठोंबरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंगळवार दि.८ सप्टेंबर रोजी ५ वी ते ७ वी गटासाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि बुधवार दि.९ सप्टेंबर रोजी ८ वी ते १० वी व ११ वी-१२ वी गटासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन विक्रम बिस्कीटे, सुनील जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तरी संस्थेच्या या अमृत महोत्सवी वर्षातील सर्व कार्यक्रमांना क्रीडाप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले आहे.
चौकट-
या स्मृती समारोहाचा मुख्य सांगता कार्यक्रम आणि गुरूवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि.१६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स.७ वा. समाधी दर्शन व सामुदायिक प्रार्थना, स.८ वा. सांगोला विद्यामंदिर येथे
कै.बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर स.१० वा. मुख्य सांगता समारंभ कोल्हापूरचे प्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.