सोलापूर – नू.म.वि. शिशुशाळा, डफरीन चौक, सोलापूर येथे बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी हरितदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय अर्चना कुलकर्णी यांच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून मोगरा गटाचे पालक श्री. नामदेव सर्जे व सौ. प्रांजली सर्जे उपस्थित होते.
यावेळी पंचमहाभूतांचे पूजन व आरती करण्यात आली. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमुळेच आपले जीवन सुरक्षित आहे, त्यामुळे त्यांचे पूजन म्हणजेच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय. या पूजनातून मुलांमध्ये निसर्गाचे रक्षण करण्याची जाणीव रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय अर्चना कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकातून मुलांना निसर्ग हा आपला खरा मित्र आहे, झाडे आपल्याला प्राणवायू देतात, फळे-फुले देतात, सावली देतात म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याची काळजी घ्यावी, पाणी वाचवावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा असा सुंदर संदेश दिला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार करण्यात आला.
केदार गटाचे नृत्य व वृक्षपूजन हे प्रमुख आकर्षण
या कार्यक्रमात केदार गटातील विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर वृक्षपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला.
माननीय मुख्याध्यापिका अर्चनाताई कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमास सांस्कृतिक प्रमुख सौ. अलका ओक, सौ. मृणाल देशपांडे, सौ. सारिका कुलकर्णी, सौ. स्नेहा गजेंद्रगडकर यांच्यासह सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर वृंद यांनी यशस्वीपणे पार पाडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रंजना काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
——
Post Views: 19